आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाडेवाढ


मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरासह आजपासून मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. मुंबईत आजपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये झाले असून ही भाडेवाढ मुंबई एमएमआर रिजनमध्ये लागू असणार आहे. ही भाडेवाढ आजपासून लागू होईल तर 31 मेपर्यंत मीटरमधील बदलांची प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले होते.

तीन रुपयांची वाढ रिक्षाचे दरात झाल्यामुळे आता रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला 18 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 14.20 पैसे मोजावे लागणार आहेत. ही भाडेवाढ 1 मार्च 2021 पासून लागू होणार आहे. 22 रुपयांऐवजी टॅक्सीसाठी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यानंतर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 16 रुपये मोजावे लागणार आहेत. हे भाडे 1 मार्च ते 31 मेपर्यंत कार्डनुसार आकारता येणार आहे. त्यानंतर 1 जूनपासून मीटरमध्ये बदल झाला पाहिजे. गेल्या 6 वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात न आल्यामुळे भाडेवाढ करण्यात आल्याचे अनिल परब यांनी सांगितले.