महापौर निवास परिसरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणीस सुधारित मान्यता


मुंबई – मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या ४०० कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टण्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा १ मध्ये सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे. रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे.

टप्पा-१ करिता अंदाजित किंमत २५० कोटी रुपये (करांसहित) इतकी आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा-२ मध्ये तंत्रज्ञान, लेझर शो. डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. टप्पा २ करिता १५० कोटी रुपये (करांसहित) खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने टप्पा १ व टप्पा २ निहाय कामाची एकूण रु. ४०० कोटी अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने सदर प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा १ व २ स्वरूपात काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली.

मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक प्रकल्पासाठी लागणाऱ्या ४०० कोटी रक्कमेचा खर्च सुरुवातीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.