नांदेड येथे होणार शासकीय परिचर्या (बी.एस्सी.) महाविद्यालय


मुंबई – नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शासकीय परिचर्या (बी.एस्सी.) महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता 50 असणार असून यासाठी आवश्यक पदनिर्मितीस आणि खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी 16 कोटी 9 लाख 14 हजार 480 च्या खर्चास मान्यता देण्यात आली.

नांदेड शहर शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या मराठवाड्यातील एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असल्याने जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या भागातील बरेचसे लोक शहरास भेट देतात. तसेच नांदेड शहरात शीख धर्माचे पवित्र स्थान असल्यामुळे तेथे दरवर्षी भाविक तसेच पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. परिणामी, येथील आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न असे परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.