डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्यावरणाच्या मुद्यावरुन भारतावर टीका


न्यूयॉर्क: व्हाइट हाऊस सोडल्यानंतर पहिल्यांदाच एका कार्यक्रमाला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हजेरी लावली. त्यांनी कंझरव्हेटिव्ह गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडले. पॅरिस करारात अमेरिकात पुन्हा एकदा सहभागी होणार असल्याची घोषणा बायडेन यांनी केली. ट्रम्प यांनी या कार्यक्रमात पर्यावरणाच्या मुद्यावरुन भारतावर टीका केली.

डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामधील ओरलँडोमध्ये पार पडलेल्या कंझरव्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या (सीपीएसी) वार्षिक बैठकीत बोलत होते. त्यांनी यावेळी म्हटले की, आम्ही नियमांचे पालन करत होतो. पण, वायू प्रदूषणात सर्वाधिक भर चीन, रशिया आणि भारत घालत होते. प्रत्येक गोष्टींचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तर, दुसरीकडे चीनने १० वर्षांसाठी करण्यात येणाऱ्या कामाचीही सुरुवात केली नाही. तर, रशियादेखील जुन्याच पद्धतीने काम करत आहे. भारत हा प्रदूषण करणारा देश असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

ट्रम्प यांनी बायडेन यांच्या इमिग्रेशन धोरणावरही टीका केली. बेकायदेशीपणे होणाऱ्या इमिग्रेशनचा मार्ग बायडेन यांनी मोकळा केला आहे. योग्यतेच्या आधारावर इमिग्रेशन मिळायला हवे असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकेत योग्यतेच्या आधारावर प्रवेश दिला पाहिजे. जेणेकरून अमेरिकेला मदत होईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले. याआधीदेखील डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली होती. मागील वर्षी झालेल्या अमेरिका अध्यक्षीय वादविवादातही ट्रम्प यांनी भारताला सर्वाधिक प्रदूषण करणारा देश म्हणत गंभीर आरोप केले होते.