धावताना या गोष्टींची घ्या खबरदारी

running
शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाचे महत्व आपण सर्व जाणतोच. यासाठी लोक आपल्याला सहज झेपतील असे आणि वेळ असेल त्याप्रमाणे निरनिराळे व्यायामप्रकार निवडत असतात. सध्याच्या काळामध्ये व्यायाम म्हणून धावणे अतिशय लोकप्रिय ठरत असून, देश-विदेशी आयोजित होणाऱ्या अनेक मॅरॅथॉन्समध्ये लोक उत्साहाने सहभागी होत असतात. धावणे हा असा व्यायाम आहे, ज्यासाठी कोणत्याही जिम इक्विपमेंटची आवश्यकता नाही. तसेच याला वयाचे, वेळेचे, जागेचे बंधनही नाही. किंबहुना तुम्ही कामानिमित्त किंवा सुट्टीनिमित्त बाहेरगावी, अगदी परदेशामध्ये जरी असलात, तरी हा व्यायाम तिथेही करता येण्याजोगा असल्याने हा व्यायाम खूपच लोकप्रिय ठरत आहे. मात्र धावणे व्यायाम म्हणून स्वीकारताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून या व्यायामामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा (injury) किंवा इतर त्रास होणार नाही.
running3
धावताना, त्याची योग्य पद्धत (टेक्निक) अवलंबली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे इजा होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. धावताना श्वासोच्छ्वास कसा असावा याला ही मोठे महत्व आहे. धावताना श्वासोच्वाळेस दीर्घ असावा. यामुळे फुफ्फुसांना प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत असतो. श्वास घेताना त्यामध्ये एक प्रकारचा ‘रिदम'(rhythm) असावा. दोन पावलांसाठी श्वास घेणे आणि दोन पावले श्वास सोडणे असा हा रिदम असावा. धावताना आपल्या कंबरेच्या वरचा भाग ताठ असावा. धावताना पाठीचा कणा, खांदे झुकलेले नसतील याची काळजी घ्यावी. पाठीच्या स्नायूंकडे विशेष लक्ष असावे. धावताना पोश्चर (posture) चुकीचे असेल तर त्यामुळे खांदे, मान, आणि पाठदुखीची समस्या उद्भवू शकते.
running2
धावताना आपली मान ताठ ठेवावी, आणि नजर आपल्या पुढे दहा फुट अंतरावर, जमिनीवर असावी. खालच्या बाजूला पहात धावणे टाळावे. तसेच धावत असताना मानेचे आणि जबड्याचे स्नायू आवळून धरू नयेत. धावताना खांदे पुढच्या बाजूला झुकवू नयेत. त्यामुळे खांद्याच्या स्नायूंमध्ये वेदना उत्पन्न होऊ शकते. धावताना आपले हात कोपरातून नव्वद अंशांच्या कोनामध्ये असावेत, व धावताना हातांची खांद्यांतून पुढे-मागे हालचाल करावी. त्याचप्रमाणे धावत असताना आपले गुडघे अगदी थोडेसे वाकलेले असावेत. असे केल्याने धावताना बसणारे हादरे, गुडघे व्यवस्थित सहन करू शकतात. धावताना पावले सरळ पडतील याची खबरदारी घ्यावी. धावताना पुढे पाउल टेकताना पावलाचा मध्यभाग आधी टेकेल याची काळजी घ्यावी. पावलाची बोटे किंवा टाच आधी टेकताना इजा होण्याचा धोका अधिक असतो.
running1
धावताना पावलांमधील अंतर फार जास्त असू नये. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त तणाव टाळता येतो. आपले शरीर आपल्याला काय सांगते या कडे लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे. जर धावत असताना कोणत्याही प्रकारची वेदना उद्भविली तर धावणे तत्काळ थांबवावे. धावल्यानंतर शरीराला पुरेशी विश्रांती देणे ही गरजेचे आहे. त्याचबरोबर स्नायूंना पोषण मिळावे या करिता प्रथिनांनी परिपूर्ण संतुलित आहार, आणि भरपूर पाणी पिणे ही आवश्यक आहे.

Leave a Comment