दररोज आकाराने वाढणारी चित्तूरची गणेशमूर्ती

temple
भारतामध्ये गणेशोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा सोहळा असून, गणपतीबाप्पा हे सर्व देशाचे लाडके दैवत आहे. भारतामध्ये अनेक प्राचीन गणेशमंदिरे असून, यातील अनेक गणेशमूर्ती स्वयंभू, म्हणजेच आपोपाप तयार झालेल्या आहेत. या गणेशमंदिरांविषयी अनेक रोचक आख्यायिका ही प्रसिद्ध आहेत. अशीच रोचक आख्यायिका चित्तूर येथील कनिपक्कम गणेशमंदिराशीही निगडित आहे. कनिप्क्कम विनायक मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये आहे. हे मंदिर अकराव्या शतकामध्ये बांधविले गेले असून, या मंदिराचे निर्माण चोला वंशाच्या राजा कुलोतुंग (पहिले) यांनी करविले होते.
temple1
या मंदिराशी निगडित आख्यायिका आहे, त्यानुसार या ठिकाणी मंदिर उभारले जाण्यापूर्वी तीन भाऊ येथे राहत असत. या तिघांपैकी एक भाऊ आंधळा होता, दुसरा मुका होता, तर तिसरा बहिरा होता. हे तीनही भाऊ शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने या ठिकाणी विहीर खोदत असताना काही पाषाण खोदून काढल्यानंतर पाणी लागलेच पण त्यासोबत त्या ठिकाणी अचानक रक्ताच्या धारा वाहू लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाहता पाहता खणलेला खड्डा लाल रंगाच्या पाण्याने भरू लागला. आणि तेव्हाच या भावांना त्या ठिकणी एक गणेश प्रतिमा दिसली. गणेशमूर्तीचे दर्शन घडताच या तिघा भावांचे अपंगत्व दूर झाले.
temple3
या चमत्काराची कथा पाहता पाहता सर्वत्र पसरली, आणि या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करू लागले. त्यानंतर गावातील थोरा-मोठ्यांच्या सल्ल्याने या मूर्तीची याच ठिकाणी स्थापना करण्यात आली.
temple5
येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या नुसार या गणेशमूर्तीचा आकार दररोज थोडा वाढत असतो. एका भाविकाने या गणेशमूर्तीसाठी बनविलेली वस्त्रे काहीच दिवसांमध्ये लहान होऊन गेली असल्याचे भाविक म्हणतात. या गणेशमूर्तीच्या पोटाचा आकार आणि गुडघ्याचा आकार दररोज थोडा थोडा वाढत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.
temple2
हे गणेशमंदिर ज्या ‘बाहुदा’ नदीच्या मधोमध आहे, त्या नदीबद्दलही एक आख्यायिका आहे. एके काळी संखा आणि लिखिता नामक दोन भाऊ होते. हे दोघे यात्रेला निघाले असता, भुकेने व्याकूळ झाले होते. तेव्हा वाटेत त्यांना काही आंब्याची झाडे दिसली. लिखिताने झाडावरचे आंबे तोडण्याचा विचार केला, पण ही झाडे इतरांच्या मालकीची असल्यामुळे संखाने आंबे तोडण्यास नकार दिला.
temple4
लिखिताने आंबे तोडून खाल्ले खरे, पण ही गोष्ट गावातील पंचांच्या कानावर गेली. त्यांनी लिखिताचे हात छाटून टाकण्याची शिक्षा फर्मावली. लिखिताचे हात छाटून नदीमध्ये पडले व तेव्हाच चमत्कार होऊन त्याचे हात पुन्हा त्याच्या शरीराला जोडले गेले. म्हणूनच ‘हात देणारी नदी’ या अर्थी ‘बाहुदा’ हे नाव या नदीला पडले असल्याची आख्यायिका आहे.

Leave a Comment