एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जलद पोहोचायचे झाल्यास विमान प्रवासासारखा दुसरा पर्याय नाही. हा पर्याय वेळ वाचविणारा आणि आजच्या काळामध्ये सामान्य माणसाला परवडणारा झाला आहे. म्हणूनच कामानिमित्त जायचे असो, वा सुट्टीसाठी जायचे असो, विमानप्रवास हा सर्वांच्या पसंतीचा पर्याय बनला आहे. विमानाने प्रवास करताना काही व्यक्तींना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुलांसोबत प्रवास करताना खास काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे लहान मुलांना प्रवासाचा विशेष त्रास होऊ नये यासाठी काही गोष्टींचे नियोजन आधीपासून करण्याची आवश्यकता असते.
विमानाने प्रवास करण्यासाठी त्याची तिकिटे बहुतेकवेळा आधीपासूनच आरक्षित केलेली असतात. आपण ज्या ठिकाणी जाणार असू, तिथे पोहोचण्यासाठी आड वेळी, रात्री अपरात्री निघावे लागणार नाही, किंवा आड वेळी विमान त्या ठिकाणी पोहोचत नाही, अशा प्रकारची प्रवासाची वेळ निवडावी. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अर्थातच हा पर्याय अभावानेच उपलब्ध असतो. पण आंतरदेशीय प्रवास करताना लहान मुलांचे वेळापत्रक बिघडणार नाही अशा पद्धतीनेच शक्यतो प्रवासाची वेळ निश्चित करावी. मुलांच्या झोपेचे आणि खाण्यापिण्याचे वेळापत्रक बिघडले, तर मुले चिडचिडी होऊ शकतात व त्याचा त्रास मुलांना आणि पालकांना ही होतो.
प्रवासाला निघताना मुलांची औषधे बरोबर जरूर ठेवावी. तसेच विमान प्रवासामध्ये कानामध्ये क्वचित दडे बडत असल्याने मुलांना अशा वेळी चघळण्यासाठी चॉकोलेट्स बरोबर ठेवावीत. मूल अगदी लहान असेल, तर त्याला कडेवर घेऊन चालण्याच्या ऐवजी फोल्डेबल स्ट्रोलर (बाबागाडी) बरोबर नेण्याचा विचार करावा. अनेक विमानतळांवर आपल्या निश्चित टर्मिनल पर्यंत पोहोचण्यासाठी बरेच अंतर चालून जावे लागते. अशा वेळी थोडेफार सामान बरोबर असताना लहान मूल कडेवर घेऊन चालणे ही मोठी कसरतच असते. म्हणून स्ट्रोलर बरोबर असू द्यावा.
मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांची काही आवडती खेळणी किंवा चित्रे रंगविण्यासाठी कलरिंग बुक बरोबर घ्यावे. विमान प्रवास करताना प्रवासाच्या वेळेअगोदर काही तास विमानतळावर पोहोचणे आवश्यक असते. एकदा सर्व औपचारिक ‘चेक्स’ पार पडल्यानंतर आपल्या हाताशी बराच वेळ असतो. त्या वेळामध्ये मुलांना व्यस्त ठेवणे आवश्यक असते. तसेच विमानामध्ये बसताना सर्वात शेवटी विमानामध्ये शिरावे. विमानाचे ‘बोर्डिंग’ उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या अर्धा ते पाऊण तास आधीपासूनच सुरु होते. सर्वात आधी विमानामध्ये जाऊन बसले, तर पुढील अर्धा तास मुलांना एका जागी, त्यांच्या सीटवरच बसवून ठेवणे कठीण होऊ शकते. म्हणून सर्व प्रवाश्यांचे बोर्डिंग झाल्यांनतर सर्वात शेवटी विमानामध्ये शिरावे.