चांगल्या अभ्यासाबरोबरच उत्तरपत्रिका कशी लिहावी हे जाणून घेणे ही विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे

exam
वार्षिक परीक्षा सुरु होण्याचे दिवस आता जवळ येऊन ठेपले आहेत. विशेषतः जे विद्यार्थी यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसणार आहेत, त्यांच्यासाठी अंतिम परीक्षा आणखीनच महत्वाच्या आहेत. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची सुरु असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या खेळ, मनोरंजन इत्यादी सर्व गोष्टी थोड्या मागे पडल्या असून, विद्यार्थीवर्ग अभ्यासामध्ये गढून गेलेला पहावयास मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या जोडीने त्यांचे पालकही येणाऱ्या परीक्षांच्या काळासाठी कंबर कसत आहेत. अभ्यास उत्तम असेल, तर अवघड प्रश्नपत्रिकाही सोपी होऊन जाते हे तर खरेच, पण त्याचसोबत उत्तम मार्क मिळविण्यासाठी त्या विषयाचे ज्ञान असण्यासोबतच, उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहिली जावी हे माहिती असणे देखील महत्वाचे ठरत असते. म्हणजेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी कशा प्रकारे लिहितो याला देखील महत्व असते.

उत्तरपत्रिकेमध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना या प्रश्नाचा योग्य क्रमांक स्पष्टपणे टाकणे महत्वाचे असते. पेपर वेळेत पूर्ण करण्याची धांदल म्हणा, किंवा परीक्षेमळे आलेला मानसिक तणाव म्हणा, त्यामुळे अनेकदा गडबडीत विद्यार्थी प्रश्नाचा योग्य क्रमांक लिहिण्यास विसरतात, किंवा प्रश्नाचा क्रमांक चुकीचा लिहितात. अश्या वेळी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीचाही गोंधळ उडतो आणि प्रश्नाचा क्रमांक आणि त्याचे लिहिलेले उत्तर यांचा काहीच ताळमेळ लागत नसल्याने उत्तर बरोबर असूनही, केवळ प्रश्नाचा क्रमांक चुकल्याने विद्यार्थ्याला मार्क गमवावे लागतात. म्हणूनच प्रश्नाचा योग्य क्रमांक ठळक, सहज वाचता येईल अशा अक्षरामध्ये लिहिणे आवश्यक आहे.
exam1
पेपरमध्ये ज्या प्रश्नाची उत्तरे थोडक्यात लिहिण्यासंबंधी सूचना असते, असे प्रश्न बहुधा दोन, तीन किंवा चार मार्कांचे असतात. तसेच ही उत्तरे १५० ते २०० शब्दांमध्ये लिहिली जाणे अपेक्षित असते. या शब्दमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. त्यापेक्षा वीस ते तीस शब्द अधिक लिहिले जाणे चालू शकणारे असले, तरी त्यापेक्षा अकारण लांब उत्तरे लिहिणे टाळावे. उत्तरासाठी शब्दमर्यादा असल्यास उत्तर मुद्देसूद पण त्याचबरोबर थोडक्यात असावे. परीक्षकांच्या दृष्टीने शब्दमर्यादा पाळली जाणे महत्वाचे ठरत असते. त्यामुळे या गोष्टी कडे लक्ष दिले जाणे आवश्यक आहे.

सहा ते आठ मार्क असलेल्या प्रश्नांची उत्तरे विस्तारपूर्वक असणे अपेक्षित असते. या उत्तरांसाठी मिळणारे मार्क अधिक असल्याने ही उत्तरे महत्वाची ठरत असतात. या प्रश्नांची उत्तरे साधारण ३५०-४०० शब्दांमध्ये लिहीली जाणे अपेक्षित असते. आवश्यकता आणि वेळ असल्यास ही उत्तरे त्याही पेक्षा ५०-१०० जास्त शब्दांमध्ये लिहिली जाऊ शकतात. ही उत्तरे लिहिताना सर्वप्रथम प्रश्न ज्या विषयासंबंधी आहे, त्याचे थोडक्यात ‘introduction’ लिहावे. त्यामध्ये विषयाशी निगडित परिभाषा इत्यादी समाविष्ट कराव्यात. नंतरच्या मुद्द्यांमध्ये विषयाशी निगडित थियरी, नियम, ‘principles’, इत्यादींचा समावेश असावा. आवश्यक त्या ठिकाणी उदाहरणे समाविष्ट केली जावीत. उत्तरे विस्तारपूर्वक लिहिताना अनेक परिच्छेदांमध्ये विभागली जाऊन, यांमध्ये तेच तेच मुद्दे वारंवार लिहिणे टाळावे. तसेच या उत्तरांमध्ये आवश्यक ग्राफ, डायग्रॅम, फॉर्म्युला अवश्य समाविष्ट असावेत. तसेच डायग्रॅम व्यवस्थित ‘लेबल’ केला जाणे आवश्यक आहे.
exam2
उत्तरपत्रिका लिहिताना त्यामध्ये वारंवार खाडाखोड करणे टाळावे. तसेच उत्तर लिहिताना एखादी चूक झालीच तर त्यासाठी उत्तरपत्रिकेच्या संपूर्ण पानावर खाडाखोड टाळावी. एखाद्या प्रश्नाचे उत्तर एकत्र, एकाच वेळी लिहून संपवावे. थोडे उत्तर एका पानावर, त्या उत्तराशी निगडित मुद्दा इतरत्र कुठे तरी अश्या प्रकारे उत्तरे लिहिणे टाळावे. प्रश्नपत्रिका बहुधा चार ‘सेक्शन्स’ मध्ये विभागलेली असते. त्यापैकी कोणताही सेक्शन आधी सोडविला जाणे स्वीकार्य असले, तरी एका वेळी तो सेक्शन संपूर्ण सोडवून संपवावा आणि मगच दुसऱ्या सेक्शनमधील प्रश्न सोडविण्यास सुरुवात करावी. आधी एका सेक्शनमधील एक प्रश्न, मग मधेच दुसऱ्या सेक्शनमधील दुसराच प्रश्न अश्या प्रकारे उत्तरपत्रिका लिहिली गेल्यास उत्तरपत्रिका तपासणाऱ्याचा गोंधळ उडू शकतो. परिणामी विद्यार्थ्याचे मार्क कापले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या बाबतीतही काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment