पहा लोकरीने विणलेली संपूर्ण गावाची प्रतिकृती

Woolery3
आजवर एका शहाराच्या रचनेची तयार केली गेलेली प्रतिकृती आपण अनेकदा पाहिली असेल. बहुतेकवेळी ही प्रतिकृती प्लास्टर ऑफ पॅरीस, कार्डबोर्ड किंवा तत्सम वस्तूंचा वापर करून तयार केली जाते. मात्र उत्तरी आयर्लंड मधील क्लाऊमिल्स या छोट्याश्या गावातील महिलांनी आपल्या गावाची प्रतिकृती चक्क लोकरीने विणून तयार केली आहे.

Woolery1
या छोट्याश्या गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सुबक दुमजली घरे आहेत, गावामध्ये एक लहानसा बाजार आहे, एक पोस्ट ऑफिस आहे, आणि एक रेस्टॉरंट देखील आहे. केवळ दोन हजारांच्या आसपास जनसंख्या असलेल्या या गावामध्ये पाच चर्चेस आहेत. तसेच इतर लहान मोठ्या सरकारी इमारती, बागा इत्यादीही आहेत, आणि हे सर्व आपल्याला एकत्र पहावयास मिळते, या गावातील स्त्रियांनी तयार केलेल्या गावाच्या लोकरी प्रतिकृतीमध्ये. गावातील ‘क्रोशे’ पद्धतीने लोकरीचे विणकाम करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र येऊन ‘क्रोशे ग्रूप’ बनविला आणि या ग्रूपने आपल्या गावाची अप्रतिम प्रतिकृती लोकरीने विणून तयार केली. गावाच्या मेमोरियल ऑरेंज हॉल येथे ही प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आली आहे.
Woolery2
याच गावामध्ये राहणाऱ्या मे एचेसन या महिलेने सहा वर्षांपूर्वी क्रोशे ग्रूपची स्थापना केली. सहा वर्षांपूर्वी थोडेच सभासद असणाऱ्या या ग्रुपमध्ये आजच्या काळामध्ये तीस सभासद आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये या ग्रुपने आपल्या गावाची प्रतिकृती विणून तयार करण्याचे निश्चित केले. त्यानंतर सर्व सभासद आपापले कॅमेरा घेऊन बाहेर पडले आणि गावातील प्रत्येक इमारतीच्या रचनांची छायाचित्रे त्यांनी टिपली. त्यानंतर विणण्याचे काम सुरु झाले. सप्टेंबर महिन्यामध्ये ही प्रतिकृती संपूर्ण तयार झाली.
Woolery
या प्रतिकृतीमध्ये गावातील सर्व घरे आणि इमारतींच्या सोबत एके काळी अस्तित्वात असलेल्या, पण आता अगदी मोडकळीला आलेल्या इमारतीदेखील पहावयास मिळत आहेत. त्यामध्ये एके काळी अस्तित्वात असलेली शर्ट बनविण्याची फॅक्टरीही बनविली गेली आहे. आता आपल्या गावाची प्रतिकृती तयार केल्यानंतर या महिला बेलफास्ट शहराची प्रतिकृती बनविण्याच्या विचारात असल्याचे म्हटले जाते. पण त्या करता अर्थातच त्यांना आणखी पुष्कळ सभासदांची गरज भासणार आहे.

Leave a Comment