मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केलं आहे. २१ फेब्रुवारीला राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. म्हणजेच १ मार्चला लॉकडाउन लावायचा की नाही यासंबंधी उद्धव ठाकरे निर्णय़ जाहीर करण्याची शक्यता आहे. पण सोशल मीडियावर त्याआधीच लॉकडाउनची अफवा पसरण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात १ मार्चपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊन संदर्भात व्हायरल झालेल्या मेसेज मागील सत्य
सध्या एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राज्यात १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. एका वृत्तवाहिनीच्या लोगोसहित असलेला उद्धव ठाकरेंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. अनेकजण एकमेकांना फोन, मेसेज करुन यासंबंधी विचारणाही करत आहेत. पण हे वृत्त पूर्णपणे खोटे असून असा कोणताही निर्णय उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला नाही.
फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर अशा अनेक ठिकाणी हा बनावट फोटो व्हायरल झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी अनेक शहरे आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत हे खरे असले तरी लॉकडाउनसंबंधीची कोणताही निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेला नसल्यामुळे तुमच्याकडे हा फोटो आला असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नकाच, पण तो पुढे कोणाला फॉरवर्डदेखील करु नका.
सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. कोरोनाबाधितांच्या वाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.