मुंबई – पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता असून भारतातील न्यायालयात नीरव मोदी याने खटल्याला सामोरे जावे असे हे प्रकरण असून, त्याच्याविरुद्ध तेथे निष्पक्ष सुनावणी होणार नाही हे सिद्ध करणारा कुठलाही पुरावा नाही, असा निर्णय ब्रिटनमधील न्यायालयाने गुरुवारी दिल्यामुळे नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठीची पूर्ण तयारी मुंबईमधील आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदीसाठी आर्थर रोड जेलमध्ये विशेष कोठडी असणार आहे.
याबाबत कारागृह अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत नीरव मोदीला आणल्यानंतर त्याला बराक क्रमांक १२ मधील एका कोठडीत ठेवण्यात येणार आहे. कडक सुरक्षाव्यवस्था या कोठडीला असणार आहे. जेलमध्ये नीरव मोदीला ठेवण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जेव्हा कधी त्याचे प्रत्यार्पण होईल त्यासाठी कारागृह आणि कोठडी तयार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
नीरव मोदीला ठेवण्यासाठी कारागृहाची स्थिती आणि सुविधांची माहिती २०१९ मध्ये महाराष्ट्र कारागृह विभागाने केंद्राला दिली होती. न्यायालयात सुनावणी सुरु असताना केंद्राने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाकडून सविस्तर माहिती मागवली होती.
नीरव मोदीला ठेवले जाणार आहे त्या कोठडीत कैद्यांची संख्या कमी असेल, असे आश्वासन कारागृह प्रशासनाने दिले आहे. मोदीला जेलमध्ये कॉटनची चटई, उशी, बेडशीट आणि ब्लँकेट पुरवले जाणार असून तीन चौरस मीटरची जागा वापरण्यासाठी मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. याशिवाय कोठडीत पुरेसा प्रकाश, व्हेंटिलेशन असेल आणि सामान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असेही सांगितले आहे.