एकाच महिन्यात तिसर्‍यांदा वाढले घरगुती सिलेंडरचे दर


नवी दिल्ली : महागाई कोरोना महामारीनंतर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी या एकाच महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढल्यामुळे आता गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात IOCने 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर वाढवले आहेत. तत्पूर्वी 4 फेब्रुवारी आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी सिलेंडरचे दर वाढवले होते. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, सिलेंडच्या दरात डिसेंबर महिन्यात दोन वेळा वाढ झाली होती. सिलेंडर 1 डिसेंबर रोजी 594 रूपयांवरून 644 रूपयांवर पोहोचला. त्यानंतर घरगुती सिलेंडरसाठी 15 डिसेंबर रोजी 694 रूपये मोजावे लागत होते. म्हणजे एका महिन्यात सिलेंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ झाल्यानंतर जानेवारी महिन्यात सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती.

पण सिलेंडरच्या दरात फेब्रुवारी महिन्यात 4 तारखेला 25 रूपयांची वाढ करण्यात आल्यामुळे 4 फेब्रुवारीला सिलेंडरसाठी तब्बल 719 रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर सिलेंडरच्या दरात 50 रूपयांनी वाढ करण्यात आली. 50 रूपयांनी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर 769 रूपये सिलेंडरसाठी मोजावे लागत होते. पण आता सिलेंडरसाठी 794 रूपये मोजावे लागणार आहेत. सिलेंडरचे दर फेब्रुवारी महिन्यात 100 रूपयांनी वाढवण्यात आले. एलपीजीच्या किंमती सा्तत्याने वाढत असल्यामुळे भारतातील पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकाला जात आहेत.