साहेबांच्या फिरकीपुढे भारताचा डाव फक्त १४५ धावांत गडगडला


अहमदाबाद – भारतीय संघाची फलंदाजी अहमदाबाद येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. टीम इंडियाच्या दिग्गजांनी इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि फिरकीपटू जॅक लीच याच्या फिरकीपुढे गुडघे टेकले. लीच-रुट जोडीने ९ गडी बाद करत भारतीय संघाला १४५ धावांत गुंडाळले. रोहित शर्माचा (६६) अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. भारतीय संघाला पहिल्या डावांत फक्त ३३ धावांची आघाडी मिळाली. जो रुट याने पाच बळी घेत भारतीय संघाचे कंबरडे मोडले. भारतीय संघाला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सात गडी गमावत फक्त ४६ धावा जोडता आल्या.

पहिल्या दिवशी ५७ धावांवर नाबाद असणारा रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या दिवशी लागोपाठ तंबूत परतले. मुंबईकर फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला. सर्वात आधी जॅक लीचने अजिंक्य रहाणेचा अडथळा दूर केल्यानंतर जम बसलेल्या रोहित शर्मालाही तंबूचा रस्ता दाखवत भारताला अडचणीत पाडले.

अनुभवी जोडी मैदानाबाहेर गेल्यानंतर नवख्या ऋषभ पंतवर सर्व मदार होती. पण, ऋषभ पंत आणि वॉशिंगटन सुंदर यांना कामचलाऊ फिरकी गोलंदाज आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने माघारी धाडले. भारतीय संघाचे आठ फलंदाज अवघ्या १२५ धावांवर माघारी परतले. अजिंक्य रहाणे ७ आणि ऋषभ पंत १ धावेवर स्वस्तात बाद झाले. रविचंद्रन अश्विन १७ धावा काढून तंबूत परतला. जो रुट याने अश्विनला बाद केले. भारतीय संघाकडे सध्या पहिल्या डावांत फक्त २२ धावांची आघाडी आहे. लोकल बॉय अक्षर पटेल याला फलंदाजीत अपयश आले. रुटने त्याला शून्य धावसंख्येवर बाद केले.