महापुरुषांच्या यादीतून संत नामदेव महाराजांचे नाव ठाकरे सरकारने वगळले – चंद्रकांत पाटील


मुंबई – दरवर्षी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी राज्य सरकारकडून जाहीर केली जाते. राज्य सरकारने यंदाही थोर व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा यंदाच्या थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्याने घेतला आहे. पण, संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव यंदाच्या यांदीत नसल्याने नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे.


थोर महापुरुष संतांच्या यादीतून ठाकरे सरकारने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव वगळले असून आज यासंदर्भात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळाने मला निवेदन दिले. हा विषय आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात लावून धरू, असे यावेळी सर्वांना मी आश्वस्त केले, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, 16 फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, 17 सप्टेंबरला केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि 27 डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात येणार आहे.