लॉकडाऊन संदर्भातील अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – अनिल देशमुख


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच नागरिकांची चिंता सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांमुळे आणखी वाढताना दिसत आहे. लॉकडाऊनबाबत चुकीचे मेसेज, फोटो तयार करु सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची दखल घेतली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.


ट्विट करत अनिल देशमुख यांनी म्हटले की, महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

21 फेब्रुवारी रोजी राज्यातील जनतेशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. राज्यात लॉकडाउन नको हवा असेल, तर लोकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, सतत होत धुणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली असून राज्यात सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.