पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांवर नवी जबाबदारी


कोलकाता – बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा भाजप नेते आणि राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात येणार असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून बोलले जात होते, त्यात मागच्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांवर प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.


त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांवर पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचाराचीही जबाबदारी देण्यात आली आहे, देवेंद्र फडणवीस त्याचसाठी सोमवारी पश्चिम बंगालमध्ये देखील दाखल झाले आहेत. त्यांनी याठिकाणी परिवर्तन यात्रेला सुरू केली आहे. याचे काही फोटो फडणवीसांनी त्यांच्या ट्विटर हॅँडलवरून शेअर केले आहेत, त्यात पश्चिम बंगालमधील सतगाचिया विधानसभा मतदारसंघात अम्तालापासून परिवर्तन रॅली सुरू केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली, यावेळी पश्चिम बंगालच्या जनतेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रेम आणि स्नेह बघायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांचे सरकार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा परत येणार नाही, याठिकाणी असलेला हिंदु नागरिक दुय्यम दर्जाचा बनला आहे, पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून शेतकऱ्यांना स्वत:च्या राजकारणासाठी वंचित ठेवण्यात आले आहे, त्याचबरोबर गरिबांसाठी असलेली आयुष्यमान भारत योजनेत मिळणाऱ्या ५ लाखांपर्यंत मोफत उपचार यापासून सर्वसामान्य जनता वंचित असल्याचे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर सोडले.