टूलकिट प्रकरणी दिशा रवीला न्यायालयाकडून जामीन मंजूर


नवी दिल्ली – दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिलासा दिला आहे. दिशाला पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी यावेळी दिशाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. पोलिसांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावत दिशाला जामीन मंजूर केला. दिशाला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असून, स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनासंदर्भातील एक टूलकिट ट्विट केली होती. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात दिशा रवी हिला बंगळुरूतील तिच्या घरून अटक केली होती. अटक केल्यानंतर दिशाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस कोठडी एका दिवसाने वाढण्यात आली होती. आज दिशाला दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायाधीश धर्मेंदर राणा यांनी दिशाला दोन हमीदारांसह एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.