व्हायरल; लग्नात स्वयंपाक करतानाचा हा व्हिडीओ पाहून तुमचाही संताप होईल


एकीकडे देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होत असतानाच दुसरीकडे सध्या लगीनघाई सुरु असून नातेवाईकांपैकी किंवा ओळखीतील कोणाचे तरी निमंत्रण तुम्हाला देखील आले असेलच. लग्नात जायचे म्हटले की तिथे जेवायला काय असेल हा विचार प्रत्येकाच्याच डोक्यात असतो. अन् लग्न आटोपले की जेवणावरच संपूर्ण चर्चा सुरु असते. पण सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहिल्यानंतर तुमच्या मनात देखील एखादी व्यक्ती इतकी विकृत कशी असू शकते असा विचार येईल.


उत्तर प्रदेशातील एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. लग्नाचा स्वयंपाक या व्हिडीओत सुरु असून स्वयंपाकी तंदुरी रोटी करताना दिसत आहे. या व्हिडीओत विकृत बाब म्हणजे स्वयंपाकी रोटी तंदुरमध्ये टाकण्याआधी त्याच्यावर थुंकत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून तो फक्त एका नाही तर बनवणाऱ्या प्रत्येक रोटीवर अशा प्रकारे थुंकताना दिसत आहे. १६ फेब्रुवारीचा हा व्हिडीओ असून हे लग्न मेरठमध्ये होते.

मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल झाला असून मेरठ पोलिसांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याची विनंती नेटकऱ्यांनी केली. सध्या कोरोनाच्या संकटात ही किती गंभीर बाब आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. या घटनेची दखल घेत हिंदू जागरण मोर्चाने मेरठ पोलीस स्थानकाबाहेर गोंधळ घातल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या विकृत स्वयंपाक्याचे सोहेल असे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.