बैठकीच्या ठिकाणी वेळेआधीच पोहचले अजित पवार… अन् अधिकाऱ्यांची झाली पंचाईत


पुणे – आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कायम चर्चेत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या आणखी एका गोष्टींची चर्चा असते, ती म्हणजे वक्तशीरपणा! सकाळपासूनच अजित पवारांच्या कार्यालयीन कामाला सुरूवात होते. त्यामुळे जिथे कुठे त्यांचा कार्यक्रम असेल, तेथील अधिकाऱ्यांची तारांबळ होते. असाच काहीसा प्रसंग पुण्यात अनुभवायला मिळाला.

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यातही कोरोनाच्या नवीन प्रकाराची भीती व्यक्त केली जात आहे. पुन्हा कोरोना पुण्यात बळावणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जात असून, आज जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली होती.

सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरू होणार होती. त्यामुळे बैठकीची तयारी त्या हिशोबाने सुरू होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठ वाजताच अचानक बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. उपमुख्यमंत्री आधीच दाखल झाल्याचे कळाल्यानंतर प्रशासनाची पंचाईत झाली. साधारण तासभर अगोदर अजित पवार हे आल्याने, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाल्याची दिसून आले.

पहाटे लवकर उठून अजित पवार हे आपल्या दैनंदिन कामाला सुरूवात करतात. त्यांच्या पहाटे उठवण्याच्या सवयीबद्दल त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. सकाळी लवकर उठण्याची सवय आजोबांची नाही तर चुलत्यांमुळे (शरद पवार) लागली आहे. आम्ही जसे पाहतोय तसे चुलते २७ वर्षांचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. रात्री दोनला आले, तरी सकाळी सातला काम सुरूच. आता वय वर्ष 80 पूर्ण झाले, तरी देखील आजही सकाळपासून साहेब कसे काम करत असतात, हे आपण पाहतो. शेवटी तुमच्यावर कसे संस्कार होतात त्यावर अवलंबून असते. सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण देखील स्वछ असते. एक, उत्साह असतो, असे अजित पवार म्हणाले होते.