लॉकडाऊनसंदर्भातील अफवा पसरवाल, तर होणार दंडात्मक कारवाई


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी सध्या चिंताजनक वळणावर आल्यामुळे आता त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. त्याचबरोबर प्रशासन अनेक नियमांचे सक्तीने पालन करण्यासाठी आग्रही आहे. या साऱ्यामध्ये आता संचारबंदी, लॉकडाऊन यासारखे शब्द पुन्हा एकदा कानी पडू लागले आहेत.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत योग्य ती खबरदारी घेत आहे. दरम्यान नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत: आटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. नागरिकांनी जर संयमी जबाबदारी पार पाडली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जमावबंदीचे आदेश नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे असून ज्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर अथवा ट्विटर, इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुण्यातही काही जुन्या माहितीचे व्हिडीओ, फोटो वापरत ठराविक भागांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचव़ड येथेही लॉकडाऊन लागू केल्याचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला. मुख्य़ म्हणजे यामुळे जनमानसात संभ्रमाचे वातावरणही पाहायला मिळत आहे. पण, तूर्तास पुण्यात कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे असले तरीही कोरोनावर ताबा मिळवण्यासाठी म्हणून आखून दिलेल्या नियमांचे पालन न झाल्यास मात्र लॉकडाऊनपासून आपण काही दूर नाही, ही बाबही ध्यानात ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.