ही तथ्ये तुम्हाला माहिती आहेत का?

fact
अनेकदा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कधी तरी अचानक अशी परिस्थिती उद्भविते, जी धोकादायक ठरू शकते. अश्या वेळी आपल्याला आवश्यक असणारी मदत आपल्याला उपलब्ध होऊ शकेलच याची खात्रीही नसते. अश्या वेळी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेऊन, कठीण परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचविण्याचे धाडस आपल्याला दाखवावे लागते. अश्या वेळी ही तथ्ये आपल्याला माहिती असल्यास कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला यांचा वापर करता येईल.
fact1
बर्फाच्छादित परिसरामध्ये स्कीईंग करत असताना किंवा पायी चालत असताना आपल्या पायांच्या खालच्या बर्फाची layer कितपत भक्कम आहे याही कल्पना आपल्याला नसते. काही ठिकाणी बर्फ वितळायला लागून तेथील बर्फाची layer अतिशय पातळ झालेली असते. अश्या वेळी पायाखालच्या बर्फाला अचानक भेगा पडण्याच्या आणि या भेगांमधून बर्फाच्या खाली असलेल्या पाण्यामध्ये पडण्याच्या अनेक घटना घडत आल्या आहेत. बर्फाला भेगा पडत आहेत हे लक्षात येताच पुढे न जाता पुन्हा मागे परतण्याचा प्रयत्न करावा. या साठी पोटावर झोपत, सरपटत बर्फावरून पुढे जावे. यामुळे तुमच्या शरीराचे वजन एकदम बर्फावर पडणार नाही. भेगा पडत असलेल्या बर्फावरून धावण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर त्वरित गरम कपड्यांमध्ये स्वतःला लपेटावे आणि वैद्यकीय मदत मागवावी.
fact2
पाश्चात्य देशांमध्ये अनेक समुद्र किनाऱ्यांवर निरनिराळ्या रंगांचे झेंडे लावले जाण्याची पद्धत आहे. पण हे रंगीत झेंडे केवळ सजावट म्हणून लावले जात नसून, यामधील प्रत्येक झेंड्यांच्यामागे काही ठराविक अर्थ आहेत. हे झेंडे समुद्रावर पोहोण्यासाठी किंवा सर्फिंग साठी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेकरिता लावले जात असतात. पण बहुतेक वेळी लोकांना या झेंड्यांचे अर्थ माहिती नसल्याने लोक अजाणतेपणी समुद्रामध्ये शिरण्याचा धोका पत्करतात. त्यामुळे या झेंड्यांचे अर्थ माहिती असणे महत्वाचे ठरते. जर एकाच दोरीवर एका खाली एक दोन लाल रंगाचे झेंडे लावले असतील, तर या ठिकाणी पाण्यामध्ये शिरण्यासाठी मनाई असल्याचे ते प्रतीक आहेत. जर एकच लाल झेंडा असेल, तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये अतिशय वेगवान ‘करंटस्’ किंवा प्रवाह असल्याचे ते सूचक आहे. पिवळ्या रंगांचे झेंडे समुद्राचा परिसर काही प्रमाणात धोकादायक असल्याची सूचन देतात, तर हिरव्या रंगांचे झेंडे समुद्राचे पाणी पोहोण्यास सुरक्षित असल्याचे दर्शवितात. जांभळ्या रंगाचे झेंडे समुद्राच्या पाण्यामध्ये जेलीफिश, स्टिंग रे यांच्यासारख्या जलचरांची उपस्थिती दर्शवितात.
fact3
एखाद्या पावसाळी हवेच्या दिवशी डोंगरावर फिरायला जाण्याचा आनंद काही औरच. पण यातील धोका आपण फारसा ध्यानी घेत नाही. जर अचानक वादळ आलेच तर वीज कोसळण्याचा हा धोका असतो. वादळाच्या वेळी वीज कोसळून आजवर अनेक लोक प्राणांना मुकले आहेत. आपण बाहेर असताना वादळ होऊन विजांचा कडकडाट सुरु झाला, तर सर्वप्रथम सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करावा. जर आपण सहलीच्या निमित्ताने किंवा हायकिंग करण्यास डोंगरांवर असलो, आणि अश्या वेळी वादळ आले, तर वीज कोसळण्याचे निश्चित संकेत निसर्ग आपल्याला देत असतो. हे संकेत ओळखून त्वरित सुरक्षित ठिकाणी पोहोचावे. वादळाच्या दरम्यान डोंगरावरील उंचीवर असताना डोक्यावरील केस अचानक ताठ उभे राहिले, तर त्या ठिकाणी वीज कोसळणार असल्याचे हे संकेत आहेत. अश्या वेळी त्वरित तिथून दूर जाऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करावा.

Leave a Comment