येत्या अधिवेशनात अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निर्णय – विश्वजीत कदम


सांगली : गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व जिल्हा कृषी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. काही ठिकाणी पंचनामे देखील सुरू झाले आहेत. पंचनाम्यांचा अहवाल लवकरच येईल. तो आल्यानंतर येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतले जातील, अशी माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे गेल्या वर्षीही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने त्यावेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत जाहीर केली होती. यातील साडे पाच हजार कोटी शेतीसाठी वितरित करण्यात आले आहेत. तर उर्वरित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ऊर्जा विभागाला देण्यात आल्यामुळे नुकसानीचा अहवाल आल्यावर निश्चित मदत करण्याबाबतची भूमिका सरकारकडून घेतली जाईल, असे मंत्री विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.

अवकाळी पावसाने राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला झोडपले आहे. अवकाळी पावसाने नांदेड, लातूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, अकोला, परभणी, भंडारा या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये हजेरी लावली. ज्वारी, गहू, केळी, भुईमूग, हरभरा पिकांसह द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात आला आहे.