पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्यांवर अजित पवारांचे भाष्य


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक शैली आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते कुणाचाही आपल्या शैलीत थेट समाचार घेत असतात. पोलिसांना मिळणाऱ्या महागड्या गाड्यांबाबत आता त्यांनी भाष्य केले आहे. अजित पवार पुण्यात बोलताना म्हणाले की, मला काही पोलिस अधिकारी मुंबईत असताना भेटण्यास आले, त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या पाहिल्या असता त्याची किंमत 35 लाख रुपये असल्याचे समजले. याबाबत चौकशी केली असता असे समजले की, उअशा महागड्या गाड्या पोलिसांना द्योगपतीने दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्रमात सांगितले.

अजित पवार यावेळी म्हणाले की, सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कुणी कशी वाहने वापरावी याबाबत नियमावली आहे. पोलिस शासनाचे कर्मचारी असून उद्योगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करताना वापरणे हे चुकीचे आहे. गृहमंत्री कोणते वाहने वापरतात आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणत्या वाहनाने फिरतात याकडे जनतेचे लक्ष असते. पोलिसांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या घरांचे काम सरकार प्राधान्याने करत असून त्यासाठी निधीही देत आहे. जादा एफएसआय आणि चांगल्याप्रकारचे दर्जेदार घर देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.

अनुकंपा तत्वावरील भरतीचा कार्यक्रम काल पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला. अजित पवार यावेळी म्हणाले की, आपल्या हद्दीत गुन्हा होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. आपापल्या हद्दीत रात्रगस्त वाढवावी. यावेळी ते गजानन मारणे प्रकरणाविषयी बोलताना म्हणाले की, संबंधित पोलिसांनी या प्रकरणात असे वागायला नको होते. ते का घडले याची कारणे शोधायला हवीत. संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा त्यांच्या अशा वागण्याने खराब होते. एखादा गुंड तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढतो. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. शहराच्या दृष्टीने असे होणे बरोबर नाही. याविषयी पोलिसांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक असला पाहिजे. सामान्य लोकांना पोलिसांचा आधार वाटला पाहिजे. याची दक्षता पोलिसांनी घेणे गरजेचे असल्याचेही अजित पवार म्हणाले.