मुंबईतील कोरोनाचा प्रकोप सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु केल्यामुळे, टास्क फोर्स सदस्याचे मत


मुंबई : मागील आठवड्याभरापासून आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या रुग्णवाढीच्या कारणांचा विचार केला तर त्यातील एक कारण लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करणे हे असू शकते, असे मत कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर दिवसाला होणारी कोरोनाबाधितांची वाढ ही नियंत्रणात आली होती. यासंदर्भातील वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.

जानेवारीमध्ये दर दिवसाला साडे तीनशे-चारशेच्या जवळपास वाढत असलेली रुग्णसंख्या अचानक फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात 800 पर्यंत वाढत आहे. जरी सर्वसामान्य लोकांसाठी लोकल मर्यादित वेळेत सुरू करण्यात आली असली तरी प्रवासी संख्या ही 20 लाखाहून 35 लाखापर्यंत पोहोचली आणि दुसरीकडे रुग्णसंख्या सुद्धा वाढत चालली आहे. ही वस्तुस्थिती असून मुंबईतील कोरोना रुग्णवाढी मागे अनेक कारणांमध्ये लोकलसेवा सर्वांसाठी सुरू करणे हे सुद्धा एक कारण असल्याच डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांची संख्या ही 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान दरदिवशी वाढत असून 17 फेब्रुवारीला 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत 721 ने वाढ झाली तर 18 फेब्रुवारीला 736 रुग्णांची भर पडली तर 19 फेब्रुवारीला 24 तासात नव्याने कोरोना निदान झाल्याची संख्या 823 एवढी झाल्यामुळे वाढत असलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे व त्याची कारणे समजून घेणे हे स्थानिक प्रशासनासाठी एक आवाहन आहे.

रुग्णसंख्या नियंत्रणात यावी म्हणून मुंबई महापालिकेने नियम आणखी कडक केले असून मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई अधिक कडक केली जात आहे. रुग्णवाढी मागे स्थानिकांचा हलगर्जीपणा हे सुद्धा एक कारण असल्याचे मुंबईच्या महापौरांनी सांगितले व त्यामुळे प्रशासनासोबत आपण सुद्धा आपली काळजी आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे.