या दिवशी रिलीज होणार नागराज मंजुळे आणि बिग बींचा ‘झुंड’


कोणत्याही चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन झळकणार असल्याचे जेव्हा जाहीर करण्यात येते, तेव्हापासूनच या चित्रपटाबाबतची चाहत्यामध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. बिग बी मराठमोळा आणि अनेक पुरस्कारांना गवसणी घालणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याही आगामी ‘झुंड’ या चित्रपटातून झळकणार असल्याची माहिती समोर आली, चित्रपट नेमका केव्हा प्रदर्शित होणार, याचीच उत्सुकता त्या क्षणापासूनच पाहायला मिळाली. चित्रपटाचा टीझरही चाहत्यांच्या भेटीला आला. पण, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र लांबणीवर पडली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शानाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे.

या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाची उत्सुकता टीझरने शिगेला पोहोचवली आणि अखेर आता हा चित्रपट यंदाच्याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अनेक तारखांच्या अंदाजानंतर आता अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुहूर्त मिळाला आहे.


बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार यंदाच्याच वर्षी 18 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल माहिती देताना लिहिले, कोरोनाने आपल्याला अनेक झटके देत मागे आणले. पण आता दमदार पुनरागमनाची वेळ आली आहे. आपण अखेर त्या दिवसांमध्ये परतलो आहोत…… बिग बींच्या या पोस्टनंतर अनेकांनीच कमेंट बॉक्समध्ये चित्रपटाच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल संघ बनवला होता. याच एकंदर कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे.