नवी दिल्ली – एका न्यायाधीशासोबतच एका महिला आरोपीने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे. लाचखोरीच्या आरोपात राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या पिंकी मीना यांना अटक झाली. महामार्गाची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पण मंगळवारी त्यांचा विवाह 10 दिवसांच्या अंतरिम जामिनावर असताना झाला. विशेष म्हणजे, पिंकी यांचे पती न्यायाधीश असल्यामुळे सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा राजस्थानात रंगली आहे.
न्यायाधीशासोबतच आरोपी महिला झाली विवाहबद्ध, पण पाच दिवसांनी पुन्हा जावे लागणार जेलमध्ये
पहिल्याच प्रयत्नात पिंकी मीना या आरएएस (RAS) अर्थात राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. तर, राजस्थानच्या बसावाचे पिंकी मीना यांचे पती नरेंद्र दौसा हे असून राजस्थान ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये (RJS) निवड झाल्यापासून त्यांची सध्या जयपूरमध्ये ट्रेनिंग सुरू आहे.
पिंकी मीना यांच्यावर मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्या जवळपास महिन्याभरापासून याप्रकरणी तुरूंगात होत्या. पिंकी मीना यांनी लग्नासाठी राजस्थान उच्च न्यायालयाकडे जामिन मागितला होता, त्यावर न्यायालयाने त्यांना 10 दिवसांचा अंतरिम जामिन मंजूर केला होता. त्यांचा जामिनाचा कालावधी 21 फेब्रुवारी रोजी संपणार असल्यामुळे 21 तारखेला मिना पुन्हा आत्मसमर्पण करतील.
मिना या राजस्थानमधील बांदीकुईच्या उपविभागीय दंडाधिकारी (SDM) म्हणून जानेवारी महिन्यापर्यंत कार्यरत होत्या. त्यानंतर दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे कंत्राट असलेल्या कंपनीकडून १० लाख रुपये मागितल्याचा आरोप त्यांच्यावर झाला व राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना १५ जानेवारी रोजी अटक केल्यानंतर त्यांनी कनिष्ठ न्यायालयात लग्नाचे कारण सांगून जामिन मागितला होता, पण कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामिन नाकारला. त्यानंतर उच्च न्यायालयात जामिनासाठी मिना यांनी अर्ज केला.
यावेळीही न्यायाधीशासोबत लग्न केल्यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो, असे म्हणत सरकारी वकिलांनी मिना यांच्या जामिनाला विरोध केला होता. पण, अखेर न्यायालयाने मिना यांना १० दिवसांचा जामिन मंजूर केला. आता लग्न झाल्यानंतर मीना या २१ तारखेला पुन्हा आत्मसमर्पण करतील, त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, मीना यांची लग्न पत्रिकाही चांगलीच चर्चेत होती. त्यांच्या निमंत्रण पत्रिकेवर ‘इतना ही लो थाली में… व्यर्थ न जाए नाली में…’ यासह कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेशही छापण्यात आले होते. आरोपी आणि न्यायाधीश विवाहबंधनात अडकल्याने या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे.