मागील २४ तासांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत ५ हजार ४२७ ची वाढ


मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसत असून राज्य सरकार देखील या पार्श्वभूमीवर आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर पुन्हा लॉकडाउन देखील लागू केला जात आहे. मागील २४ तासांत राज्यभरात ५ हजार ४२७ नवे कोरोनाबाधित वाढले असुन, ३८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावरून हळूहळू कोरोनाचे संकट पुन्हा गडद होते की काय? अशी भीती आता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. आता २० लाख ८१ हजार ५२० वर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे.

दरम्यान, मागील २४ तासांमध्ये २ हजार ५४३ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यभरात आतापर्यंत १९ लाख ८७ हजार ८०४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.५ टक्के आहे. तर, अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४० हजार ८५८ असून, आजपर्यंत कोरोनामुळे ५१ हजार ६६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आलेल्या १,५५,२१,१९८ नमून्यांपैकी २० लाख ८१ हजार ५२० (१३.४१ टक्के)नमूने पॉझटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १६ हजार ९०८ जण गृहविलगीकरणात असुन, १ हजार ७४३ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.