सोशल मीडियात आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप फेक


मुंबईः राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा असतानाच. लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण सोशल मीडियावरही आले आहे. तर, काही ठिकाणी अफवांनाही पेव फुटले आहे. नुकतीच सोशल मीडियात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील फेक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. आरोग्यमंत्र्यांनी यावर ट्विट करत खुलासा केला आहे. मास्क न वापरण्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. पण, या क्लिपमधील आवाज माझा नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.


आरोग्यमंत्री कोरोनाबाबतीत काही मोठा निर्णय किंवा सूचना असतील तर पत्रकार परिषद किंवा ट्विटरच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. पण, गेल्या काही दिवसांपासून विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री सूचना देत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ही ऑडिओ क्लिप फेक असल्याचे समोर आले आहे.


कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय उरेल आणि लोकहितासाठी तो कठोर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी ठामपणे सांगितले. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला, याकडे लक्ष वेधताना राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांच्याशी चर्चा करून कडक नियमांचा निर्णय घेऊ, असेही राजेश टोपे यांनी नमूद केले.