माजी केंद्रीय मंत्री अकबर मानहानी प्रकरणात प्रिया रमाणी निर्दोष


नवी दिल्ली – उच्च न्यायालयाकडून MeTooच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या आणि केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांना मानहानी प्रकरणात झटका मिळाला आहे. प्रिया रमाणी यांना निर्दोष ठरवत उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बदनामी केल्याचा आरोप करत रमाणी यांच्याविरुद्ध अकबर यांनी याचिका दाखल केली होती. दशकांनंतरही महिलेला तक्रार करण्याचा अधिकार असून एखाद्याच्या प्रतिष्ठेचा बळी केवळ तुमच्या कीर्तीसाठी दिला जाऊ शकत नसल्याचे म्हणत अकबर यांना न्यायालयाने फटकारले.

MeTooच्या चळवळीने जगभरात जोर धरल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्याविरुद्ध पत्रकार प्रिया रमाणी यांच्यासह २० महिलांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. यांसदर्भात ट्विट करून झालेला प्रकाराबद्दल प्रिया रमाणी यांनी पहिल्यांदाच वाच्यता केली होती. एम. जे. अकबर यांना प्रिया रमाणी यांच्या तक्रारीनंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अकबर यांनी याप्रकरणी प्रिया रमाणी यांच्यामुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप केला होता. या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज निकाल दिला.

महिलांचा सन्मान करायला सांगणारे महाभारत आणि रामायण ज्या ठिकाणी लिहिले गेले, तिथे महिलांविरुद्ध अशा घटना घडत असतील तर हे लज्जास्पद आहे. लैंगिक शोषण समाजात प्रतिष्ठा असलेला माणूसही करू शकतो. जे आरोप केले गेले आहेत, ते सामाजिक प्रतिष्ठेला जोडून आहेत. पण लैंगिक अत्याचार आणि शोषणाचा पीडितांवर होणारा परिणाम समाजाने समजून घ्यायला हवा. महिलांना अनेक दशकांनंतरही तक्रार करण्याचा अधिकार असल्याचे म्हणत न्यायालयाने प्रिया रमाणी यांची मानहानीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.