अनुसूचित जमातीच्या दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना


नाशिक : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात. याअनुषंगानेच आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळा तसेच इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू करण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास उप आयुक्त अविनाश सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावी परीक्षेत कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेतील विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या पाच मुले व पाच मुली यांना राज्यस्तरावरील परीक्षेतील गुणवत्तेनुसार रोख स्वरुपात बक्षीस देण्यात येणार आहे.

रोख स्वरूपात देण्यात येणाऱ्या बक्षिसांची रक्कम :

  • प्रथम क्रमांक : 30, 000/-रुपये
  • द्वितीय क्रमांक : 25,000/- रुपये
  • तृतीय क्रमांक : 20,000/- रुपये
  • चतुर्थ क्रमांक : 15,000/- रुपये
  • पाचवा क्रमांक : 10,000/- रुपये

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2019-20 या शैक्षणिक वर्षातील शालांत आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे निकाल उशिरा जाहीर झाले असल्याने कोरोना कालावधीतील मर्यादा लक्षात घेता हे बक्षीस वितरण पुढे ढकलण्यात आले होते. परंतू आता त्या गुणवंत विद्यार्थ्यांना देखील बक्षीस देण्यात येणार आहेत.

आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत या प्रोत्साहनपर बक्षीस योजनेसाठी सर्व अपर आयुक्तालये यांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळा तसेच इतर शाळांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील शालांत आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालाची यादी तपासून शाळांमधील प्रथम पाच मुले आणि मुली यांची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विभागांकडून याद्या प्राप्त झाल्यानंतर राज्यस्तरावर वरील उल्लेखित शाळा प्रकारानुसार प्रथम पाच मुले आणि पाच मुली असे क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

आमचे विद्यार्थी प्रतिभावान असून मेहनत आणि चिकाटी यामुळे नेहमीच प्रगती करतात. सदर योजनेच्या माध्यमातून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरुपात पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आर्थिक मदत होणार असल्याचे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी नमूद केले आहे.