मागील २४ तासांत राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आलेख, तर ४० जणांचा मृत्यू


मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत असून राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरू असल्यामुळे राज्यात आता पुन्हा लॉकडाउन लागू होतो की काय? अशी भीती राज्यातील जनतेच्या मनात मनात आहे. राज्यभरात मागील २४ तासांमध्ये ४ हजार ७८७ नवे कोरोनाबाधित वाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ८५३ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे.

आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. कोरोनातून आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ जण बरे झाले आहेत. ३८ हजार १३ राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या असून, आजपर्यंत कोरोनामुळे ५१ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. हे वृत्त एएनआयने राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने दिले आहे.

९५.६२ टक्के राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आहे. राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत १५,४३,५५,२६८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २० लाख ७६ हजार ९३ नमूने (१३.४३टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ जण गृह विलगीकरणात असुन, १ हजार ६६४ जण संस्थात्कम विलगीकरणात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्बंध शिथिल करताना लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेशही दिला आहे.