आता ‘या’ नावाने ओळखला जाणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ


नवी दिल्ली – एप्रिल-मेच्या दरम्यान इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14 वा सीजन सुरु होणार आहे. अशा काही संघांपैकी किंग्ज इलेव्हन पंजाब एक आहे ज्याला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. परंतु पंजाब संघाने 14 व्या सीजनपूर्वी मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले असून इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीजनमध्ये ‘पंजाब किंग्ज’ म्हणून ओळखला जाणार आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा गेल्या मोसमात दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आठ आयपीएल संघांमध्ये समावेश होता. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, बर्‍याच काळापासून नाव बदलण्याचा विचार पंजाबचा संघ करत होता. आयपीएलचा सीजन सुरु होण्यापूर्वी हे करणे योग्य होईल. संघाचे नाव बदलण्याचा हा निर्णय अचानक घेतलेला नाही.

मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्या मालकीचा पंजाबचा संघ आहे. पण संघाला एकदादेखील आयपीएल जिंकता आलेला नाही. संघ एका सीजनमध्ये उपविजेत होता आणि एकदा तिसऱ्या स्थानावर होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबने लिलावाच्या अगदी आधी आपल्या संघाच्या नावात बदल केला आहे. 18 फेब्रुवारीला इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमासाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे. पंजाब संघाने गेल्या मोसमानंतर मॅक्सवेलसह अनेक बड्या खेळाडूंना रिलीज केले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडे खेळाडूंवर बोली लावण्यासाठी 50 कोटींपेक्षा जास्त रक्कम आहे. पंजाब संघाने या मोसमात टॉप लीडरशीपमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नव्या सत्रात संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे राहतील. याशिवाय हा संघ केएल राहुलच्या नेतृत्वात नवीन मोसमात खेळेल.