मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी


रायगड : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा भीषण मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री अपघात झाला. कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात पाचही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

दरम्यान , नवी मुंबईतील डॉक्टर वैभव झुंजारे यांची आई, पत्नी आणि 5 वर्षीय मुलीचा या अपघातात मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत डॉ. वैभव झुंजारे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. जखमींपैकी दोघांना पनवेल, दोघांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील मृतांची नावे
1. मंजू प्रकाश नाहर, वय 58 वर्ष, गोरेगाव पश्चिम
2. डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय 41 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
3. उषा वसंत झुंझारे, वय 63 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
4. वैशाली वैभव झुंझारे, वय 38 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
3. श्रीया वैभव झुंझारे, वय 5 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई

पुण्याला एका कार्यक्रमासाठी अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र गेले होते. हा अपघात पुण्याहून परतत असताना झाला. एका कंटेनरने मागच्या बाजून टेम्पोला धडक दिली. या धडकेमुळे टेम्पो पलटी झाला आणि मागून येणाऱ्या या दोन कार टेम्पोला धडकल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या दोन्ही गाड्यांनी धडक दिल्याने अपघाताची भीषणता वाढली.