ईडीची पीडा लावण्यामागे देवेंद्र फडणवीस!; हसन मुश्रीफ


नगर: महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात ईडीची पीडा लावली जात आहे. राज्यात हे प्रकार आता वारंवार घडत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच यामागे असल्याचा सनसनाटी आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. महाराष्ट्र सरकार हे प्रकार रोखण्यासाठी ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ संबंधी लवकरच कायदा करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

आज नगर दौऱ्यावर हसन मुश्रीफ होते. पत्रकारांशी यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, भाजप प्रत्येक गोष्टीत अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण करीत आहेत. भाजपच्या विरोधातील आवाज देशात सर्वत्र दाबून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही राजकारण खेळले जात आहे. येथेही भाजपच्या विरोधातील लोकांच्यामागे ‘ईडी’ची चौकशी लावली जात आहे.

आता आमची खात्री झाली आहे की, फडणवीस हेच हे सर्व करीत आहेत. राज्यात वाढत असलेल्या या प्रकारांकडे राज्य सरकार आता गंभीर्याने पाहत असून यासंबंधी लवकरच कायदा केला जाणार आहे. राजकीय हेतुने ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या केंद्रीय संस्थांचा वापर करणाऱ्यास प्रतिबंध करणारा कायदा राज्यात महाविकास आघाडी सरकार आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूप्रकरणी म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे अद्याप वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही. केवळ संशय आणि आरोपावरून कोणाला असे आयुष्यातून उठविले जाऊ नये. पूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतीतही असाच प्रकार झाला होता. शेवटी ती तक्रारच मागे घेतली गेली. या प्रकरणातील सत्यही लवकरच बाहेर येईल. पण, महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची भाजपच्या मंडळींना खूपच घाई झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशा घटनांचे भांडवल करून निराधार आरोप केले जात आहेत.

देशप्रेम आणि देशद्रोहाच्या नावाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्य लढ्यात ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभागही नव्हता, त्यांना कुणालाही देशप्रेमी आणि देशद्रोही ठरविण्याचा काय अधिकार आहे?, असा सवाल करताना सलग ७० दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला यश आलेले नाही, याकडे मुश्रीफ यांनी लक्ष वेधले.

मुश्रीफ नगर जिल्ह्यातील रेखा जरे खून प्रकरणासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, यातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अटक न करण्यासंबंधी पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. त्याचे काही कारणही नाही. उलट ही कारवाई लवकर व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आपण याचा आजच आढावा घेतला. पोलिसांनी तेव्हा आरोपीचा ठावठिकाणा समजला असल्याचे सांगून लवकरच आरोपीला अटक होणार असल्याचे आपल्याला सांगितले आहे.