महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोनाबाधित


मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः ट्विट करुन शिंगणे यांनी दिली आहे. माझी कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असेही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये राजेंद्र शिंगणे म्हणतात, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.

दरम्यान २ फेब्रुवारी रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ही माहिती देशमुख यांनी स्वत: ट्विट करून दिली होती. देशमुख यांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. तर ९ फेब्रुवारी रोजी राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी देखील ही माहिती ट्विटद्वारे दिली होती. आपण कोरोनावर मात करून लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होणार, असे त्यांनी म्हटले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांपैकी राजेंद्र शिंगणे हे एक गणले जातात. त्यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे शिंगणे हे प्रतिनिधीत्व करतात.