सेलिब्रेटींच्या त्या ट्विट प्रकरणी आम्ही करणार भाजपच्या आयटी सेलची चौकशी


नागपूर : आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिले होते. त्यांच्या ट्विटबद्दल भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे, एकूण 12 जणांची ओळख झाली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख हे कोरोनातून बरे झाले असून त्यांना आज सुट्टी मिळाली. त्यांच्यावर 5 फेब्रुवारीपासून नागपूरच्या एक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. त्यांनी आज पत्रकारांशी बोलत असताना सेलिब्रिटींच्या चौकशी प्रकरणावरून खुलासा केला आहे.

सेलिब्रिटींच्या ट्विट प्रकरणात माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला. भाजपच्या आयटी सेलची आम्ही चौकशी करणार आहे. 12 लोकांची ओळख झाली असून त्यांची चौकशी होणार असल्याची महत्त्वाची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर हे आमचे दैवत आहे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वाक्याचा विपर्यास केल्याचेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

याबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तक्रार केली होती. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाच्या ट्विटनंतर अनेक कलाकार, खेळाडू यांनी एक सारखे ट्विट केले होते. यातील शब्द सुद्धा अगदी एकसारखेच होते. या सेलिब्रिटींनी एक सारखे ट्विट केले का या संदर्भात दबाव नेमका कोणाचा होता का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.

एकसारखेच अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्विट होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे त्याबद्दल तक्रार केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे गुप्तचर विभागाला आदेश देण्यात आले आहे. सेलिब्रिटींवर कुणी दबाव आणत असेल तर ते गंभीर असल्याचेही सचिन सावंत यांनी सांगितले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनीही भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केल्याचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले होते.