संजय राठोड यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांना बंजारा समाजाने दिला ‘हा’ इशारा


यवतमाळ: भाजपच्या नेत्यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात रान उठवल्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड अडचणीत आले आहेत. पण, बंजारा समाज आता त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावला आहे. आमचा समाज न्यायनिवाडा न करताच समाजातील नेत्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र खपवून घेणार नसल्याचा इशारा बंजारा नेत्यांकडून देण्यात आला आहे.

शनिवारी यवतमाळमध्ये बंजारा समन्वय समितीची संजय राठोड यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांसंदर्भात बैठक पार पडली. बंजारा नेत्यांनी यावेळी संजय राठोड यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंजारा समन्वय समितीकडून निवेदन पाठवण्यात येणार आहे. 15 तारखेला सेवालाल महाराज जयंतीनंतर प्रत्यक्ष निवेदन देण्यात येईल. तसेच गरज पडल्यास याविरोधात आंदोलन करण्याचीही आमची तयारी असल्याचे बंजारा समन्वय समितीचे नेते ना.म. जाधव यांनी सांगितले.

बीडमध्ये बंजारा समाज पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंजारा समाजातील प्रमुख लोकांची बैठक परळीतील गुप्त ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मोजकेच समाजबांधव उपस्थित आहेत. या बैठकीनंतर बंजारा समाज संजय राठोड यांच्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बंजारा समाजाने प्रतिकूल भूमिका घेतल्यास संजय राठोड यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होऊ शकते.

बंजारा समाजाचे नेते मनीष जाधव यांनी आज सकाळीच पूजाला न्याय मिळवून द्यायची मागणी केली होती. पुण्यामध्ये उच्चभ्रू वसाहतीत बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तिला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन शेतकरी नेते आणि विमुक्त घुमंतू जनजाती महासभा प्रदेशाध्यक्ष मनीष जाधव यांनी बंजारा समाजाला केले होते.

या प्रकरणात कर्तृत्वसंपन्न समजल्या जाणाऱ्या बड्या मंत्र्याचे नाव जोडले जात आहे. बंजारा समाजाबद्दल भालचंद्र नेमाडे यांनी आक्षेपार्ह लिखाण केले, समाजाने त्यावेळी एकजूट दाखवत आंदोलन केले. त्याप्रमाणेच आताही समाजानं एकजूट दाखवण्याची गरज आहे. कोणतेही राजकीय हेवेदावे न दाखविता न्यायासाठी समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, अशी अपेक्षा मनीष जाधव यांनी व्यक्त केली होती.