गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, पण शिवजयंतीची मिरवणूक पारंपरिक मार्गाने काढणारच


नाशिक – शहरातील शिवजन्मोत्सव मंडळांनी गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, पण शिवजयंतीची मिरवणूक पारंपरिक मार्गाने काढणारच, असा पवित्रा घेतला असून शुक्रवारी सायंकाळी सीबीएस येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलनात हा निर्धार व्यक्त करतानाच सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

दर वर्षी जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. परंतु, यंदाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. आठवडाभरावर शिवजयंतीचा उत्सव येऊन ठेपला असून, आरोग्य यंत्रणांना कोरोनाला अटकाव करण्यात बऱ्यापैकी यश आल्याने आणि बाजारपेठांमधील जनजीवन पूर्वपदावर आल्याने यंदा जयंती उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी शिवजन्मोत्सव मंडळांनी तयारीदेखील सुरू केली. पालकमंत्री छगन भुजबळ यांची याकरिता भेट घेऊन त्यांनाही मिरवणुकीची परवानगी मिळण्याबाबत साकडे घालण्यात आले.

नवीन मंडळांना परवानगी देण्यात येणार नाही. परंतु, शहरातील पारंपरिक मिरवणुका व कार्यक्रमांना परवानगी देण्यास प्राधान्य राहील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले होते. भुजबळ यांनी मंडळांच्या बैठकीत नियमांचे पालन करावे आणि अधिक गर्दी होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी, अशा सूचनाही केल्या होत्या. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने शिवजयंती सोहळा साजरा करण्यावर काही निर्बंध घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवजयंती सोहळ्यात पारंपरिक मार्गावरून मिरवणुकीस परवानगी नसल्याचे भद्रकाली पोलिसांकडून मंडळांना सांगण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही नियम पाळण्यास तयार आहोत. पण मिरवणूक काढू द्यावी, अशी विनंती मंडळांनी केली. पण,गृह विभागाच्या निर्देशांकडे पोलिसांनी बोट केल्याने मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले. सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हे पदाधिकारी आणि शिवप्रेमी चालत आले. तेथे जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. ‘तुमचे आमचे नाते काय.. जय जिजाऊ जय शिवराय…’ ‘कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही…’ अशा घोषणा देत सरकारच्या धोरणाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.