
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव मूळची परळीची असलेली पुणे स्थित तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात आल्यानंतर आक्रमक पवित्रा भाजपने घेतला आहे. कोणत्याही विषयांवर अग्रलेख लिहिणारे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आता कुठे गेले?, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक
एम.जे. अकबरांवर अग्रलेख लिहिणारे राऊत आता का अग्रलेख लिहित नाहीत?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला. एम.जे. अकबरांवर आरोप झाले तेव्हा ज्या संजय राऊतांनी अग्रलेख लिहिले. त्यानंतर भाजपने त्यांचा राजीनामा घेतला. संजय राऊत आता कुठे गेले आहेत. हा त्यांचा दुतोंडीपणा असल्याची घणाघाची टीका करत राऊतांनी या प्रकरणावर बोलायला हवे, असे भातखळकर म्हणाले.
वेगवेगळे आरोप राज्यातील अनेक मंत्र्यांवर होत आहे. एका मंत्र्यावर मागील महिनाभरापूर्वी बलात्कारासारखा गंभीर आरोप झाला. आता महिना उलटत नाही तोपर्यंतच दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप होत आहे. बदमाशांचे सरकार या राज्यात कार्यरत असल्याचा हल्लाबोल भातखळकर यांनी केला.
दुसरीकडे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात आल्याने शिवसेनेची गोची झाली आहे. या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे. पण थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना गाठून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असे त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर राऊत हे नाशिकच्या दिशेने रवाना झाल्यामुळे आता या प्रकरणावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
