जनताच उतरवेल या ठाकरे सरकारची घमेंड! – आशिष शेलार


मुंबई – राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारने विमान प्रवास नाकारला गेल्याच्या मुद्य्यावरून, भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शेलार यांनी राज्यपालांना विमानातून उतरवले या ठाकरे सरकारची घमेंड जनता आता उतरवेल! महाराष्ट्राची प्रतिमा देशभर मलिन करण्याचे काम ठाकरे सरकार का करत असल्याचे ट्विट केले आहे. ट्विटसोबत एक व्हिडिओ देखील शेलार यांनी शेअर केला असून ते ज्यामध्ये म्हणतात, राज्यपाल, महोदय ठरलेल्या प्रवासाला, दोन आठवडे अगोदर त्याची परवानगी घेऊन विमानतळावर गेले. तिथे विमानात गेल्यानंतर त्यांना उतरवलं गेले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज राज्यपालांना विमानातून उतरवले आहे. या तिन्ही पक्षांची घमेंड आता महाराष्ट्रातील जनता उतरवेल, अशा पद्धतीचे वर्तन या सरकारने केलेले आहे.

तसेच, संविधानिकरित्या या राज्याचे राज्यपाल हे प्रमुख आहेत, त्याचा सन्मान जर सरकारच ठेवणार नसेल, तर अन्य व्यवस्थेतील लोक काय ठेवतील? त्यामुळे राज्यभरात अव्यवस्था निर्माण करायची, कुठल्याही व्यवस्था योग्यरितीने चालू द्यायच्याच नाहीत. अशा पद्धतीनची वर्तवणूक पहिल्या दिवसापासून हे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार करत असल्याची टीका देखील शेलार यांनी केली आहे.


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसताना राज्यपालांचा अपमर्द होत असेल, तर या देशातील ज्या संविधानिक पदाबद्दल राज्य सरकार किती गंभीर आहे, हेच स्पष्ट होते. या ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काही माहिती नसेल, तर त्यांची आपल्या प्रशासनावर पकड आहे की नाही हे देखील स्पष्ट होते. प्रशासनातील अशा कुठल्या अधिकाऱ्याची हिंमत आहे? किंवा कोणत्या मंत्र्याची हिंमत आहे? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसताना देखील असा निर्णय घेतला गेला आहे. हे देखील स्पष्ट होणे आवश्यक आहे. जर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसताना असे झाले असेल, तर हा अपमान व अपमर्द करणाऱ्या मंत्री किंवा अधिकाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? याबाबत तातडीने निर्देश द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी याप्रकरणी केलेली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने देहरादूनसाठी निघालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास नाकारल्याने त्यांना खासगी विमानाने प्रवास करावा लागला. तर, जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे.