दिलजीत दोसांजने रिहानाला समर्पित केले आपले नवे गाणे


पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर तिच्याविषयी भारतात प्रचंड सर्च केले जाऊ लागले. लोकप्रिय अभिनेता आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांज यानेही याच कुतूहलाला उचलत आता रिहानाला समर्पित करून एक गाणे गायले आहे.

रीरी साँग (RiRi song) असे नाव असलेले हे गाणे राज राजोन्ध याने लिहिले आहे. इंटेन्स याने याला संगीत दिले आहे. दिलजीत दोसांजने बुधवारी या गाण्याचा व्हिडिओ रिलीज केला. हे गाणं दिलजीतने रिहानाला समर्पित केले आहे. रिहानने ट्विट केल्यावर काही तासातच या गाण्याचा ऑडिओ दिलजीतने रिलीज केला होता.


त्याने रिहानाच्या म्युझिक क्लिप्स या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये वापरल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताना दिलजीतने लिहिले आहे, तेरे कॉन्सर्टमें आऊंगा कुर्ता पायजामा पहनकर. दरम्यान दिलजीतने रिहानाच्या ट्विटलाही लाईक केले होते.

रिहानाबाबत या गाण्यात दिलजीतने आदर व्यक्त केला आहे. एकदम दिलजीतच्या लोकप्रिय शैलीतील हे गाणे आहे. दिलजीतने याआधीही कायली जॅनर आणि करीना कपूर या दोघींना डेडिकेट केलेली गाणी बनवली आहेत. दिलजीतने गायलेले हे गाणं आणि त्याचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. या म्युझिक व्हिडिओला एक कोटीहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.

चाहत्यांनी गाण्यावर कमेंट्स करतानाही दिलजीतचे भरभरून कौतुक केले आहे. पण त्याला काही लोकांनी विरोधही केला आहे. एका युजरने लिहिले आहे, की जे काही चांगलं किंवा वाईट असेल त्याबाबत आवाज उठवणे वाईट नाही. पण आपल्या देशातील प्रश्नांच्या सोडवणुकीत विदेशी लोकांना सहभागी करून घेणे योग्य नाही. तुम्ही चांगले गायक आहात. पण हे मात्र आपल्याला आवडले नाही.