शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घातल्यावरुन ठाकरे सरकारवर भाजपची टीका


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून हिंदू समाज सडा हुवा है म्हणणाऱ्या शर्जिल व एल्गार परिषदेसाठी पायघड्या, पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरांयाच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करायला बंधने महाविकास आघाडी सरकार घालते, अशा शब्दांमध्ये भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज टीका केली आहे.

राज्य कोरोना संकटानंतर पूर्वपदावर येत असले तरीही राज्य सरकारकडून अद्याप काळजी घेण्याचं आवाहन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदा साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून यासंबंधीची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. केशव उपाध्ये यांनी यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


शिवसेनेने सत्तेसाठी अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादी पुढे लोटांगण घातले आहे. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने घालीन लोटांगण, वंदीन चरणचा नवा प्रयोग सादर केला असल्याची टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

उपाध्ये यांनी या संदर्भात जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास निर्बंध घालणाऱ्या महाआघाडी सरकारने आपला खरा ‘रंग’ दाखवला आहे. महाविकास आघाडी सरकार हिंदू समाजाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानीला अटक करण्यास टाळाटाळ करते. शिवरायांचे नाव सत्ता टिकविण्यासाठी घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेने घालीन लोटांगणचा आणखी एक प्रयोग महाराष्ट्रात सादर केला आहे.

तसेच, शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारकडून शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. आघाडी सरकारने पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर अनेक निर्बंध घातले आहेत. सरकार दारूची दुकाने, नाईटलाइफ, बार सुरु करण्यास परवानगी देताना गर्दीचा विचार करीत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात कोरोनाच्या नावाखाली अनेक अडचणी आणल्या जात आहेत. पण धार्मिक भावना भडकवणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी देताना आघाडी सरकार मागेपुढे पाहत नाही. पण राज्यकर्त्यांच्या डोळ्यात शिवजयंती का खुपते? असा सवालही उपाध्ये यांनी पत्रकात केला आहे.