जितेंद्र आव्हाड यांनी केली म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरीची घोषणा


मुंबई – म्हाडाने आपल्या हक्काचं घऱ विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर दिली असून ठाणे, कल्याण परिसरात लवकरच ७५०० घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. याबद्दल येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ठाण्यात भंडारली आणि गोटेघर येथे तर कल्याणमध्ये शिरडोने कोणी येथील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरीची प्रक्रिया मार्चमध्ये, तर मे महिन्यात सोडत जाहीर होऊ शकते.

आज विरारमध्ये पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या घरांची लॉटरी काढण्यात आली. ज्या पोलिसांना घर हवे आहे, त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधण्याचे आवाहन आव्हाड यांनी यावेळी केले. पोलीस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना घरे उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी म्हाडाची मुंबईची लॉटरी गुरुवारी जाहीर होणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली आहे. मुंबईमधील ना. म. जोशी मार्गावरील ३०० घरांची लॉटरी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास जाहीर होईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

कोळीवाडे ही गावठाणे आहेत. गरजेनुसार पूर्व परंपरेने ही घरे बांधली गेली असून जरी ही बैठी घरे असली तरी तिथे एसआरए योजना लागू होणार नाही. कोळीवाड्यांना एफएसआय देऊन त्यांचा विकास व्हावा असा प्रयत्न असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.