केवळ दीड महिन्यातच राम मंदिर ट्रस्टकडे जमा झाला १००० कोटी रुपयांचा निधी


नवी दिल्ली – श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी देशभरात देणगी मोहिम राबवण्यात आली आहे. सध्या सुमारे १००० कोटी रुपयांचा निधी या मोहिमेच्या माध्यमातून ट्रस्टकडे जमा झाला असल्याची माहिती ट्रस्टचे एक विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली.

केंद्र सरकारने राम मंदिराच्या उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टचे काम विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने चालते. या ट्रस्टने १५ जानेवारीपासून देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ केला. याद्वारे आत्तापर्यंतच केवळ दीड महिन्यातच ट्रस्टकडे १००० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

विश्वस्त विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, या मोहिमेला दक्षिण भारतातील जनतेने देलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे. मी निधी गोळा करायच्या कामासाठी मोठा प्रवास केला आहे. या प्रकल्पासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मदत दिली आहे. निधीमध्ये वाढ होणे ही मंदिर निर्माणासाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्वाची बाब आहे. अयोध्येत मंदिर उभारायचे आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच ट्रस्टचा उद्देश नाही. तर पुढे जात रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचे या प्रकल्पाचं अंतिम उद्दीष्ट आहे.

त्याचबरोबर पेजावर यांनी राज्यातील सर्व मंदिरे ही संरक्षित करावी अशी मागणी केली आहे. कारण यामुळे मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण करण्याचा कोणी विचार करणार नाही आणि त्यामुळे भविष्यात वाद होणार नाहीत, असे विश्वप्रसन्न महाराज यांनी म्हटले आहे. विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, आरक्षण जातीवर आधारित देणे हे चुकीचे आहे. आरक्षण हे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर देण्यात यावे. प्रत्येक समाजातील लोकांनी त्यांच्या जातीला विशेष दर्जा देण्याविरोधात आवाज उठवायला हवा.