आयएनएस विराट युद्धनौकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने जगातील सर्वाधिक काळ सेवा केलेली आणि भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या आयएनएस विराट या युद्धनौकेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. युद्धनौकेचे सुटे भाग करून भंगारात विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने युद्धनौकेचे सुटे भाग करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

जुलै २०१९ मध्ये नौदलाच्या सल्ल्याने केंद्राने भारतीय नौदलात ३० वर्षे सेवा केलेल्या ‘आयएनएस विराट’ या विमानवाहू जहाजाचे भाग सुटे करण्यासाठी (डिस्मँटलिंग) आणि भंगार म्हणून विकण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. यासंदर्भात एन्व्हीटेक मरीन कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीने याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना आयएनएस विराट या युद्धनौकेचे डिस्मँटलिंग करण्याला स्थगिती दिली आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली ए. एस. बोपण्णा व व्ही. रामसुब्रमण्यम यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय खंठपीठाने दिला आहे.