चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप; बलात्काऱ्यांना क्लीन चिट देत आहेत अनिल देशमुख


मुंबई : बलात्काराच्या घटना राज्यात दररोज घडत आहेत. भंडाऱ्यात लहान बालकांचा मृत्य असो किंवा यवतमाळमधील घटना असो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री या सर्व घटना होऊनही त्या ठिकाणी फिरकलेही नाही. त्याचबरोबर बलात्काऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख क्लीन चिट देत असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे.

भंडाऱ्यात गेल्या 31 डिसेंबर 2020 ला घडलेली घटना धक्कादायक होती. त्यानंतर यवतमाळमध्ये पोलिओ ड्रॉपऐवजी सॅनिटायझर दिल्याची घटना घडली. शासनाचा हलगर्जीपणा या दोन्ही घटनांमध्ये समोर येतो. याबाबतची चौकशी समिती स्थापन केलेली नाही. त्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फिरकलेही नाही.

एवढी गंभीर घटना भंडाऱ्यात घडूनही अजून कसलीही कारवाई झालेली नाही. FIR दाखल झालेला नाही. केवळ पाच लाख रुपये दिले, म्हणजे चालते का? हे सरकार बालकांचे हत्यारे असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

खारघरमध्ये महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाला. पुण्यातही अशाप्रकरची घटना घडली. साताऱ्यातही मुकबधीर मुलीवर बलात्कार झाला. पण सरकार याची दखल घेत नाही. बलात्कार किंवा महिलांवर अन्याय झालेल्या घटनांची आम्ही तात्काळ दखल घेतो. पण बलात्काऱ्यांना गृहमंत्री क्लीन चिट देत असल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

बलात्काराच्या घटना राज्यात दररोज घडत आहेत. सत्ताधारी मंत्र्यांच्या जवळ खारघरमधील एका बलात्कार प्रकरणाचे कनेक्शन जाते, अशी आमची खात्रीलायक माहिती आहे औरंगाबाद प्रकरणाचे पुढे काय झाले, स्वत: पोलीसच आरोपीला वाचवत असतील तर? असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.