जुन्या प्रेमाला विसरायचे नसते, असे म्हणत उद्धव ठाकरेंना नितेश राणेंकडून ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा


मुंबई – व्हॅलेंटाइन डे निमित्त चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एक व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना आमचे जुने प्रेम असल्याचे नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी सांगितले आहे. दरम्यान शिवसेनेत वैभववाडी येथील भाजपचे सात नगरसेवक प्रवेश करणार आहेत हे आपले व्हॅलेंटाइन गिफ्ट असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नुकतेच सिंधुदूर्ग दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. वैभववाडी येथील भाजपचे सात नगरसेवक या दौऱ्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. नितेश राणे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ती बातमी मीदेखील वाचली आहे. काही दिवसांवर व्हॅलेंटाइन डे आला आहे. शिवसेना आमचे जुने प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचे नसते, असे सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारसुद्धा मिळणार नाही अशी शिवसेनेची परिस्थिती आहे.


बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष आहे. आम्ही कालही बाळासाहेबांचा आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत. अशी अवस्था बाळासाहेबांच्या पक्षाची होऊ नये, अशी आमची भावना आहे. म्हणून हे सात नगरसेवक व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवत आहे.

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना मेडिकल कॉलेजच्या सहीसाठी फोन केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी आमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईलवर सही केली. उद्धव ठाकरेंना आम्ही काही देऊ शकत नाही. त्यांना काही दिले तरी ते घेणार नाहीत. पुष्पगुच्छही स्वीकारणार नाहीत, म्हणून हे सात नगरसेवक आम्ही आभार मानण्यासाठी पाठवत आहोत. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींना आणि शिवसेनेला मनापासून शुभेच्छा, असंही त्यांनी म्हटले आहे.