भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे – देवेंद्र फडणवीस


मुंबई – मोदी सरकारने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट करण्यासाठी खेळाडू तसेच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. याचा निषेध करावा तितका थोडा!, असल्याचे म्हणत फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.


संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे फडणवीस यांनी ट्विट केले आहे.


त्याचबरोबर भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, अशी मागणी देखील ट्विटद्वारे फडणवीस यांनी केली आहे.

दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. आता सेलिब्रिटींनी देखील या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देणे सुरू केले आहे. देशातील बॉलिवूड कलाकार, क्रीडा क्षेत्रासह अन्य दिग्गजांचाही यात समावेश आहे. या पैकी काहींनी हा आपला देश विभागण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगून, तसे होऊ देऊ नका असे आवाहन केले आहे.