आयसीसीकडून ऋषभ पंतला मानाचा पुरस्कार जाहीर


नवी दिल्ली – क्रिकेट जगतासाठी २०२० हे वर्ष फारसे चांगले नव्हते. कोरोनामुळे सुमारे पाच ते सहा महिने क्रिकेट विश्व पूर्णपणे ठप्प होते. कोरोना संकटामुळे पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकादेखील स्थगित करण्यात आल्या होत्या. क्रिकेटने वर्षाच्या अखेरीस हळूहळू पुन्हा जोर धरला. आता क्रिकेट मालिका कोरोनासंदर्भातील नव्या नियमांनुसार खेळल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२१ पासून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आणि भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंत पहिल्याच पुरस्काराचा मानकरी ठरला.


भारतीय संघ जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. ऋषभ पंतने या मालिकेतील दोन डावात संस्मरणीय खेळी केल्या. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ९७ धावांची धडाकेबाज खेळी होती. तर त्याने चौथ्या सामन्यात नाबाद ८९ धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी २०२१मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

जानेवारी महिन्यात ऋषभ पंतने ४ डावांत २४५ धावा केल्या. ८१.६६च्या सरासरीने त्याने धावा कुटल्या. त्याने ४ झेल टिपले. तसेच एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवल्यामुळे आयसीसीच्या मतदान समितीने आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी ऋषभ पंतची निवड केली.