आता उत्तराखंडमधील प्रलयाचे नेमके कारण शोधणार इस्रो


नवी दिल्ली – उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले असून अनेक संस्था बचावकार्यात सहभागी झाल्या आहेत. पण अशा दुर्घटना भविष्यात टाळण्याच्या दृष्टीने सध्या संपूर्ण दुर्घटनेचा अभ्यास केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिली आहे. अन्न आणि इतर मदत दुर्घटनाग्रस्तांना पुरवणे सध्या आपली प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले आहेत.

ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ही दुर्घटना हिमकड्याचा भाग कोसळल्यानेच झाल्याचे सध्या दिसत आहे. कारणे शोधण्याचा आदेश मुख्य सचिवांना देण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, २०० लोक सध्याच्या घडीला बेपत्ता आहेत. आतापर्यंत ११ मृतदेह सापडले आहेत.

डीआरडीओचे एक पथक दुर्घटनेच्या कारणाचा शोध घेत असून आम्ही इस्रोचे संसोधक आणि तज्ञांचीदेखील मदत घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दुर्घटनेच्या प्रमुख कारणांचे व्यापक विश्लेषण करण्यात आल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आम्ही योजना तयार करु, असेही त्यांनी सांगितले आहे.

सध्या वेगाने बचावकार्य सुरु असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, आरोग्य सुविधांसोबतच बचावकार्यासाठी गरज असणारी सर्व तयारी करण्यात आलेली आहे. दुर्घटनाग्रस्त गावांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न सुरु असून आर्थिक नुकसान किती झाले आहे याचा आढावा घेताना जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवणे आपली प्राथमिकता असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.